27/06/2026
नांदेड | प्रतिनिधी
नांदेड रेल्वे स्टेशनसमोरील दुचाकी पार्किंग सुविधेची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, पावसाच्या पहिल्याच सरीत पार्किंग परिसरातील मोठमोठे खड्डे उघड झाल्याने प्रवासी व अप-डाऊन करणाऱ्या कर्मचारी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे स्टेशनसमोरील या पार्किंगचा वापर दररोज शेकडो प्रवासी तसेच नोकरीसाठी अप-डाऊन करणारे कर्मचारी करतात. मात्र, पार्किंग परिसरात ठिकठिकाणी मोठे व खोल खड्डे निर्माण झाल्यामुळे दुचाकी पार्किंग करताना तसेच बाहेर काढताना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक वाहनचालकांचा तोल जाऊन ते खड्ड्यांमध्ये पडत असल्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून वाहनांचेही नुकसान होत आहे.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित पार्किंगचा ठेका (टेंडर) घेतलेल्या कंत्राटदाराने पार्किंग परिसराची योग्य देखभाल करणे अपेक्षित आहे. मात्र, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
प्रवासी व स्थानिक नागरिकांनी संबंधित कंत्राटदारास तात्काळ सूचना देऊन पार्किंगमधील सर्व खड्डे त्वरित बुजवावेत, परिसर समतल करून सुरक्षित पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा व कंत्राटदारावर राहील, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
#नांदेड